Friday, February 20, 2015

ज्येष्ठांना एसटी प्रवासात आधार कार्ड अनिवार्य - का?



परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे ज्येष्ठांना एसटी प्रवासात आधार कार्ड अनिवार्य का आहे याचे स्पष्टीकरण वाचले, कीव आणि किळस आली. राज्यकर्ते हे जनतेचे सेवक असतात हे फक्त निवडणूक प्रचारापुरतेच असते, नंतर सत्तेचा माज चढतो.

एसटी चे नुकसान टाळण्यासाठी ते आवश्यक आहे म्हणे - नुकसानीची कारणे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का, कधी बस स्थानकांना भेट दिली का, कधी प्रवास केला का बसने. तुम्ही राज्यकर्ते आहात हे दाखवून द्या - स्थानकात खाजगी बसचे एजंट का ओरडतात, त्यांना मज्जाव करता न येणारी नपुंसक व्यवस्था बदलण्याचे दायित्व नाही का आपल्यावर.

आदर्श, स्वच्छ स्थानक, निष्कलंक, पारदर्शी व्यवहार का नाही देवू शकत आपण. सगळी कडे खळगी कुठे भरता येईल इकडेच लक्ष का असावे. खरे म्हणजे निवडणुका होण्या आधी त्या उमेदवाराने पाच वर्ष काय काम केले या आधारावर त्यांना निवडून दिले पाहिजे, घटनेत तसा बदल करायला हवा.

म्हणे ज्येष्ठांना सवलत फक्त महाराष्ट्रातच आहे, मग काढून टाका कि - करा आपल्या वंशाचे नि पक्षाचे नाव उज्ज्वल. जसे काही आपल्या खिशातून किंवा पार्टी फंडातून पैसे खर्च होतो यांचा, अरे तेही आमच्याकडूनच येतात कि पैसे.

म्हणे प्यान-कार्ड वर प्रवाशांचा पत्ता नसतो, पत्ता काय त्यांच्या घरी जावून तपासून बघतो का कंडक्टर, किंवा परिवहन खात्यातले तुम्ही कुणी. कि रेकॉर्ड करता तुम्ही लॉगशीट वर, काय करता तुम्ही पत्त्याचे, बसमध्ये प्रवास करणारा काय टेररिस्ट  असतो का?

म्हणे बँकेतही आधार कार्ड आवश्यक झाले आहे. साहेब बँकेचे खाते उघडायचे काम हे फावल्या वेळात करण्यासारखे आहे, काही न काही कागद पत्रे नेहेमीच अपुरे राहतात, आपल्या कृपेने चार चकरा माराव्याच लागतात, सोपे नाही करत तुम्ही कोणतीही गोष्ट. तसे प्रवासाचे नसते, घरापासून बस स्थानक लांब असते, आणि प्रवासाची गरज असते. बरे तुम्ही केलेंला हा अचानक बदल सगळ्या प्रवाशांना स्वप्नात दृष्टांत देवून सांगायला नको का?

खरे पाहायला गेले तर ओळख पत्र तरी कशाला हवे, जर तुम्ही रेकॉर्ड करत नसाल तर. कंडक्टर वर विश्वास आहे ना तुमचा, मग त्या प्रवाशाच्या वयाचा मान का नाही ठेवता येत, त्याच्या कृश शारीवर अजून आघात करण्यात का येवढा असुरी आनंद घ्यायचा. अरे कुठे तरी माणुसकी दाखवा कि, जसा राजा तशीच प्रजा, कंडक्टर ला जाब विचारणारे किती वेळा येता तपासायला, हल्ली तर ही जमातच नाहीशी झाल्यासारखी आहे, निदान अशात तरी तपासनीस येवून प्रवाशांची तिकीट तपासत आहे हे दृश्य बघायला मिळत नाही.

सुधारणा करायला नेहेमीच वाव असतो, इच्छा असेल तर. त्यासाठी खुर्ची सोडून मैदानात यावे लागेल, बस-स्थानकात बसावे लागेल. राज्यकर्ते कसे नाकर्ते असतात आणि किती खुर्चीचे प्रेम असते याचे हे सुंदर उदाहरण. खुर्ची सोडा, माणसात या, त्यांच्यात मिसळा, अडचणी जाणून घ्या, कुणीतरी सांगितलेले नुसते माना डोलवून ऐकू नका.

दिवाकर रावते - हे फक्त नाव आहे, माझी ही उद्विग्नता आहे, या नावाशी वैयक्तिक मला काही घेणे देणे नाही, अंध कारभारामुळे नि व्यवस्थेमुळे सामान्य माणसाला त्रास होतो. या गोष्टी कडे सकारात्मक दृष्टीने बघितले तर बदल अपेक्षित आहे, आम्हाला ऐरणीवर तर नेहेमीच चढवता.